प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क; कोलकाता उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोलकाता : वृत्तसंस्था – एका १९ वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याची याचिका तिच्या वडिलांनी कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान त्या तरुणीने मुस्लिम तरुणाशी विवाह करून मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे समोर आले. या याचिकेवर निकाल देताना कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्या. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने प्रौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय दिला आहे.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, पल्लबी सरकार (वय १९) ही तरुणी १५ सप्टेंबर २०२० पासून बेपत्ता असल्याची याचिका तिच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केली होती. दरम्यान, ७ डिसेंबर २०२० रोजी मुर्तिया पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पल्लबीने असमौल शेख नामक मुस्लिम तरुणाशी विवाह केला असून तिने इस्लाम धर्मही स्विकारला आहे.

दरम्यान, पोलिसांनी संबंधीत तरुणीचा जबाबही नोंदवला असून यामध्ये तिने आपल्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी कुठलीही सक्ती केली नसल्याचं तिनं म्हटलं असून वडिलांच्या घरी परतण्याची इच्छा नसल्याचंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपाशासित राज्यांनी लग्नासाठी जबरदस्तीनं धर्मांतर केलं तर या संदर्भात कायदे केले असून कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे.