बोगस पॅथॉलॉजी लॅबचा अहवाल देण्यात पालिकांची टाळाटाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम -राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचा गोरख धंदा खुलेआम सुरू असून रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अशा हजारो लॅब महाराष्ट्रात असून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. या लॅबवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने राज्य सरकारकडे केली असता आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगत राज्य सरकारने सर्व महापालिकांनी याबातचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाकडे काही महापालिकांनी दुर्लक्ष केल असून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ चालवली आहे.
शासनाच्या आदेशानंतरही काही महापालिकांनी आपल्या हद्दीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण अद्याप केलेले नाही. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे कार्यकारणी सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारातून हे उघड केले आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही पालिकांनी अद्यापही त्यांच्या हद्दीतील पॅथॉलॉजी लॅबची माहिती सरकारकडे सादर केलेली नाही. मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे आणि औरंगाबाद या महापालिकांनी तर अजून लॅबचे सर्वेक्षणही केलेले नाही.
महाराष्ट्रात सध्या दहा हजारांहून अधिक पॅथॉलॉजी लॅब असून सरकारद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात ३१८ लॅब बेकायदेशीर आहेत. तर उर्वरित लॅबचे सर्वेक्षण करण्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहेत. पॅथॉलॉजी लॅबमधून मिळालेल्या रुग्णाच्या चाचणी अहवालावर डॉक्टर रुग्णावर पुढील उपचार करतात. हा अहवाल चुकल्यास रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते, असे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.