पुणेकरांनो सावधान ! ‘कोरोना’बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली, पॉझिटिव्ह दर 13 टक्क्यांवर

पुणे : पुणेकरांसाठी एक चिंताजनक आणि तातडीने सावध होण्यासारखी बातमी आहे. दिवाळी संपताच पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून कोराना बाधितांची संख्या अचानक वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, मागील तीन दिवसांपासून यात वाढ झाली आहे. 10 टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता 13 टक्क्यांच्या जवळ गेला आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कोरोना चाचण्यांमध्ये साधारणत: 14 टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर दिवसभरात 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 384 जण पॉझिटिव्ह आढळले.

बुधवारी सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये 392 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी 260 जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक हजाराच्या आत आलेली ऑक्सिजनवरील रुग्ण संख्या पुन्हा एक हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 1 हजार 1 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. बुधवारी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण पुण्याबाहेरील आहे.

* शहरात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्या – 7 लाख 73 हजार 879
* आतापर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह रूग्ण – 1 लाख 65 हजार 426
* आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रूग्ण – 1 लाख 56 हजार 639
* आत्तापर्यंत झालेले एकुण मृत्यू – 4 हजार 401.