कौटुंबिक न्यायालयात पत्नीची तलवारीने वार करत हत्या, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक कोर्टाच्या सल्लामसलत सत्रात माथेफिरू पतीने पत्नीवर तलवारीने वार करून हत्या केली आहे. संबलपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश बिरामची नारायण मोहंती यांनी मंगळवारी आरोपी पती रमेश कुंभारला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कुंभारने 23 एप्रिल 2018 रोजी कौटुंबिक कोर्टाच्या आवारात समुपदेशनासाठी आलेल्या पत्नी संजिता चौधरी, तिची आई आणि आणखी एका नातेवाईकावर तलवारीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यानंतर कौटुंबिक न्यायालयात उपस्थित लोकांनी रमेशला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमींना त्वरित संबलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संजीताचा मृत्यू झाला.

सरकारी वकील दीप्ती रंजन सेंध म्हणाले की, आरोपीला शस्त्र कायद्याच्या कलम 302 (हत्या), 307, 323, 449 शिवाय 27 नुसार दोषी ठरविण्यात आले. सरकारी वकील म्हणाले की, आयपीसीच्या कलम 302 अन्वये दोषीला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरण्यात अयशस्वी झाल्यास पुढील दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिक्षा इतर कलमांतर्गत देखील दिली जाते आणि सर्व शिक्षा एकाचवेळी चालविल्या जातील.