ओडिसी इलेक्ट्रीकच्या स्लो इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च; ना लायसन अन् ना आरटीओ रजिस्ट्रेशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकी निर्मितीमधील अग्रगण्य देश म्हणून भारताचा उदय झाला. ओडिसी इलेक्ट्रीक व्हेईकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाने धावणारी ई 2 गो स्कूटर लॉन्च केली आहे. ई 2 गोची निर्मिती ही शहरांतील महिला आणि युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून करण्यात आली आहे.

लीड-ॲसिड आणि लिथियम आयन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर पळण्यासाठी किफायतीशीर आहेत. तसेच याकरिता कोणत्याही नोंदणीची किंवा परवान्याची गरज नाही. स्कूटरची सुरुवातीची किंमत देखील अतिशय कमी आहे. ई 2 गो आणि ई 2 गो लाईटची अनुक्रमे किंमत 52,999 आणि 63,999 (एक्स-शोरूम, अहमदाबाद) याप्रमाणे आहे. या उत्पादनांची मॉडेल्स 5 रंगसंगतींमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. देशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य केले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत 25 हून अधिक शहरांत ओडिसी उपलब्ध होईल.

ओडिसी ई 2 गो’मध्ये 250 वॅट, 60 व्ही बीएलडीसी (वॉटरप्रूफ) इलेक्ट्रीक मोटर बसवली आहे. स्कूटरमध्ये 1.26 Kwh लिथियम-आयन बॅटरी किंवा 28 Ah लीड ॲसिड बॅटरी हे दोन बॅटरी पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांत अँटी-थेफ्ट मॅकेनिझमची सोय आहे. इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वोच्च वेग 25 kmph असून पूर्ण चार्ज झाल्यावर 60 किमीचे अंतर पार करू शकते. चार्ज करण्य़ासाठी सुमारे 3.5 ते 4 तास लागतात. यात लिथियम बॅटरीज पोर्टेबल असून 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. या बॅटरीज ओडिसी विक्रेत्यांकडे देखील सहज उपलब्ध असतील.