मद्यधुंद ट्रॅक्‍टरचालकाने दिलेल्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

पंढरपूर (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूर – सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळच्या नागणेवाडी परिसरात गुरुवारी (दि. 24) सकाळी सहा वाजता ही घटना घडली. अपघातानंतर चालकाने ट्रॅक्‍टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला होता; परंतु जवळच थांबलेल्या तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करून ट्रॅक्‍टर थांबवला. त्या वेळी ट्रॅक्‍टर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले.

तुकाराम नागणे (वय 75 रा. उपरी) असे या वृध्दाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपरी येथील तुकाराम नागणे हे आज सकाळी घरापासून जवळच असलेल्या महामार्गालगत मॉर्निंग वॉकला गेले होते. मॉर्निंग वॉक करत असताना भाळवणीकडून पंढरपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्‍टरने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले तुकाराम नागणे हे पंढरपूर येथील पूजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे वडील होते. त्यांच्या मागे तीन विवाहित मुले, एक मुलगी व सुना नातवंडे असा परिवार आहे.