‘मी पुन्हा येईन’मुळेच ‘रंगत’ आली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याने राजकारणात रंगत आली. राजकारणात सर्व काही गांभीर्याने घेतले पाहिजे असे नाही. या वाक्याचा चांगला उपयोग राजकारण्यांपेक्षा सोशल मीडिया आणि पत्रकारांना झाला. भाजप सरकार पुन्हा येणार असल्याचा फडणवीस यांचा दावा म्हणजे 220 जागा येणार, असे म्हणण्यासारखा आहे, अशी कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मारली.

संगमनेर येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना थोरात बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात नवीन सरकार करायचे असल्याने काही गोष्टी, मने जुळणे आवश्यक असल्याने भेटी घेतल्या. किमान समान कार्यक्रमात निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मुद्दे समान आहेत. काँग्रेसचा विचार आणि शिवसेनेचे कट्टर हिंदुत्व जुळवून घेण्यासाठी काळाच्या ओघात काही बदल करणे अपरिहार्य असते. आपण राज्यघटना मानतो. त्यातील मूलभूत तत्त्वांप्रमाणे निर्णय होतील. घाईगर्दीने निर्णय न घेता, शांततेने व व्यवस्थित निर्णय घेऊन मगच पुढे जावे असा आमचा विचार आहे.

म्हणून राज्यपालांची भेट रद्द

विधानसभा निवडणुकांचे हिशेब सादर करण्याची मुदत संपत आल्याने बहुतांश आमदार मतदारसंघात असल्याने राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे.
Visit : Policenama.com