खासगी नर्सिंग होम, दवाखाने ‘तात्काळ’ सुरू करण्याचे आदेश ! अन्यथा परवाने रद्द होणार

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे मुंबईत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून अन्य आजार झालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार सांगूनही खासगी दवाखाने, नर्सिंग होम सुरू करण्यात आली नाहीत, तर त्यांचे परवाने तात्काळ रद्द करावे, असेही आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

सोसायटयांच्या आवारातील नर्सिंग होम, दवाखाने सुरू करण्यात अडथळा निर्माण करणार्‍यांवरही कायद्याचा बडगा उगारण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मुंबईत विविध आजारांमुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यांना वेळीच उपचार मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बहुसंख्य खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम अद्याप सुरू झालेली नाहीत. काही नर्सिंग होम आणि दवाखाने सोसायटी, चाळीच्या आवारात किंवा भाडयाच्या जागेत आहेत. सोसायटी किंवा चाळीतील रहिवासी त्यांना अडथळा निर्माण करीत आहेत. अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या व्यक्तींविरुद्ध ‘साथरोग कायदा 1897’नुसार कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत सर्वेक्षण करावे. नर्सिंग होम बंद असल्याचे आढळल्यास त्यांचा परवाना तात्काळ रद्द करावा. खासगी दवाखाने बंद असल्यास ‘ कारवाई करावी, असे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी विभाग कार्यालयांमधील वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत.