उस्मानाबाद : बळीराजाच्या निधीवर अधिकार्‍यांचा डल्ला, केली विना टेंडर पुस्तक खरेदी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बळीराजा चेतना अभियानाच्या निधीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले असून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व पुस्तक वाटपाची मालदार योजना आत्मा विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अवघ्या दीड महिन्यात निधीची विल्हेवाट लावण्यात आली असून, वाटप केलेल्या पुस्तकांचे लाभार्थी शेतकरी की अधिकारी हे समोर येणे गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या यशोगाथा अद्याप अंधारातच आहेत, विशेष म्हणजे पुस्तक खरेदी ही कोणत्याही टेंडर विना करण्यात आली असून या घोटाळ्याची पोलखोल होताच एका संबंधित अधिकाऱ्याने त्याच्या ताब्यात असलेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात इनवर्ड केली असल्याची माहिती आहे. या कागदपत्रात ज्या शेतकऱ्यांना पुस्तके वाटण्यात आली त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीचा समावेश आहे दरम्यान आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

तत्कालीन पालकमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत शेतकरी प्रशिक्षण व पुस्तक वाटप योजना राबविण्यासाठी आत्मा विभागाच्या प्रकल्प संचालक यांची नेमणूक करून मंजूर निधी त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी ही मालदार योजना राबविण्यासाठी उत्सुक असल्याने त्यांनी आत्मा विभागाकडून ही योजना नियोजनबद्ध रित्या काढून घेतली. योजनेची व्याप्ती अधिक असल्याने व पर्याप्त मनुष्यबळ नसल्याने ही योजना राबविण्यास आत्मा विभाग सक्षम नसल्याचे लेखी वधवून घेत योजना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंमलबजावणीसाठी निधीसह वर्ग करण्यात आली.

आत्मा विभागाने ही योजना राबविण्यासाठी सक्षम नसल्याचे कळविल्यानंतर शेतकरी प्रशिक्षणाचे काम प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत तर कृषी निगडित ग्रंथ वाटप कार्यक्रम हा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( सर्वसामान्य विभाग ) यांच्या मार्फत राबविण्याचे सुधारित आदेश १६ फेब्रुवारी २०१९ रोजी देण्यात आले त्यानुसार निधी वर्ग करण्यात आला. हा निधी ३१ मार्च २०१९ पूर्वी खर्च करून निधी विनियोगअंती उपयोगिता प्रमाणपत्र कार्यलयाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले.

दीड महिन्यापेक्षा कमी कालावधीत निधीची विल्हेवाट लावत कागदोपत्री ताळमेळ घातल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत जिल्ह्यात शेतकऱ्यांचे १०२ प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली त्यात ७ हजार १२ शेतकऱ्यांचा सहभाग दाखवत ९४ लाख खर्च करण्यात आले व उर्वरित ६ कोटी २५ लाख जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांच्याकडे २८ फेब्रुवारी २०१९ रोजी वर्ग करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात जी पुस्तके वाटण्यासाठी खरेदी करण्यात आली त्यात दूध उत्पादक मार्गदर्शिका, ग्रामीण महिलांसाठी गृह उद्योग,जिवाणू खते निर्मिती व वापर, देशी कोंबडी पालन, भाजीपाला बीजोत्पादन, जनावरांच्या रोगावर घरचा पशुवैद्य, कोरड्या हवामान विभागातील मसाले पिके, शाश्वत शेतीची गुरुकिल्ली, गांडूळ खत निर्मिती, शेळी पालनाचा कानमंत्र, जमीन मोजणीचे सोपे शास्त्र, देशी गाय, कुर्बानी बकरा, सोयाबीनची प्रक्रिया, शेळी पालन व्यवस्थापन, तणनाशके, फळे व भाजीपाला प्रक्रिया, दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, माती पाणी परीक्षण, पीक रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जमीन मोजणीचे सोपे शास्त्र, चारा पिके उत्पादन या उद्योगासह गहू, भुईमूग, सूर्यफूल, कडधान्ये, ज्वारी, तीळ, हरभरा, तूर, करडई, सोयाबीन उत्पादन कसे घ्यावे ही पुस्तके आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भौगोलिक व हवामान पूरक स्तिथीनुसार कृषीविषयक मार्गदर्शन पुस्तके व प्रशिक्षण उद्योग पुस्तके खरेदी करणे अपेक्षित होते मात्र स्टॉबेरी पिकाच्या उत्पादनासह अन्य पुस्तके खरेदी केल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हा पथदर्शी प्रकल्प राबविला गेला. त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी व त्यांचे मनोबल उंचावून उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आधुनिक पद्धतीने कमी खर्चाचा व कमी पाणी वापरून जास्तीत जास्त पीके घेण्याबाबत प्रशिक्षण व नॅकॉफ ( भारतीय राष्ट्रीय शेतकरी खरेदी प्रकीया आणि किरकोळ सहकारी संघ, पुणे ) प्रकाशित पुस्तके शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय २६ जानेवारी २०१९ च्या बैठकीत झाला, त्यानुसार या योजनेसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्यातील ७ कोटी १९ लाख जिल्हा कृषी अधीक्षक आत्मा यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

प्रकल्प संचालक आत्मा यांनी शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या उत्पादनासाठी व प्रशिक्षणासाठी आवश्यक आणि लागणारीच पुस्तके शासन नियमावलीनुसार नॅकॉफ संस्थेमार्फत खरेदी करावी व त्याच संस्थेमार्फत प्रशिक्षण आयोजित करावे असे आदेशित केले. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण महसूल मंडळाच्या ठिकाणी किंवा गावात घेऊन त्या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना पुस्तके वाटप करण्याचा निर्णय झाला. नॅकॉफच्या १९६ पुस्तकांसह ६३ कृषी पूरक प्रशिक्षण उद्योगांच्या पुस्तकांची यादी या बैठकीत देण्यात आली होती. मात्र योजनेत सोयीनुसार बदल करून ती राबविण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तकांची नोंद घेऊन नोंदवही अद्यावत ठेवण्यासह ती प्रमाणित करणे नियमावलीत आहे. प्रशिक्षण उपक्रम व पुस्तक वाटप कार्यक्रमांचे फोटो जिओ टॅगिंगसह घेऊन विडिओ शूटिंग घेण्याच्या सूचना होत्या शिवाय शेतकरी प्रशिक्षणांनंतर काही शेतकऱ्यांच्या यशोगाथाची विडिओ क्लिप तयार करण्यात येणार होती मात्र तसे झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशासन पुस्तक वाटप केल्याचा दावा करीत असले तरी, त्याचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला हे गुलदस्त्यात आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक हे या योजनेचे समन्वयक असतील तर योजनेच्या अंमलबजावणीवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी काम पाहण्याचे तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले होते. मात्र, त्यातही बदल करण्यात आले. या योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांच्या यशोगाथा अद्याप उजेडात आल्या नाहीत. बळीराजा चेतना अभियानाच्या अंतर्गत ६ कोटी २५ लाख रुपयांच्या पुस्तक खरेदीच्या प्रक्रियेची माहिती दिली नाही. तसेच या प्रक्रियेची निविदा प्रक्रियेची संचिकाही दिली नाही. या योजनेच्या चौकशीची व दोषींवर गुन्हे नोंद करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.