भोर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, 15 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

भोर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येत वाढत होत असून मृतांची संख्याही वाढू लागली आहे. दरम्यान, भोर तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून १५ गावात एक हजार ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ही गावे प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. १ मेपर्यंत या गावांमध्ये केवळ रुग्णालये आणि मेडिकल सेवाच सुरु राहणार असून उर्वरित सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या गावात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संतोषकुमार जाधव यांनी दिल्या आहेत.

भोर तालुक्यामध्ये १९६ वाड्या वस्त्या असून १५५ ग्रामपंचायती आहेत. कोरोनासंसर्ग वाढत असतानाही तालुक्यातील ५२ गावांनी कोरोनाला वेशीवरच अडवले आहे. या गावांमध्ये ना पहिल्या लाटेत ना आता एकही कोरोनारुग्ण आढळला नाही. दुसरीकडे मात्र, काही गावांमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. दिवसेंदिवस या गावांत बाधितांची संख्या वाढत चालली आहे. १५ गावांमध्ये तब्बल एका हजार ११४ बाधित आढळल्याने प्रशासनाकडून ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या गावांमध्ये पुणे-सातारा महामार्गावरील १० गावांचा समावेश आहे.

तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावरील व इतर ठिकाणची प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केलेली गावे आणि गावातील कोरोना रुग्ण संख्या पुढील प्रमाणे: सारोळे (७१),किकवी (४९),नसरापुर,(१४८),केळवडे (३४), वर्वे बुदुक (३१) वेळु (१६६),शिवरे (५३),शिंदेवाडी (१२८),ससेवाडी(४५),नाटंबी (१५), संगमनेर (८९),भोलावडे(८४),उञौली (७९),खानापुर (३०),हातवेबु (९४). दरम्यान, वेळू गावामध्ये सर्वाधिक १६६ बाधित आढळले आहे. तर नाटंबी गावात सर्वात कमी १५ बाधित आढळले आहेत. या गावांमध्ये प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले असून गावातील लोकांना महत्त्वाचा कामाशिवाय गावाबाहेर पडता येत नसून बाहेरील लोकांनाही गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संतोषकुमार जाधव यांनी दिल्या आहेत