Corona Vaccine : भारताकडून ‘सीरम’च्या कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरु होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीने घेतला आहे. ब्रिटिश सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनेका लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.

ब्रिटन हा ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे. ब्रिटनने याच आठवड्यात ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजूरी दिली आहे. त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमनं आतापर्यंत लसीचे पाच कोटी डोज तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध होईल.