पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्याच अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले – ‘जरा त्या भारतीयांकडून शिका’

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाचे संबंध जगजाहीर आहेत. पण असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चक्क भारताची प्रशंसा केली. ‘भारतीय राजदूतांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत इम्रान खान यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सुनावले. भारताच्या राजदूतांकडून काहीतरी शिका’, असे म्हटले आहे.

पंतप्रधान खान यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, ‘सौदी अरेबियामध्ये असलेल्या दूतावासातील काही कर्मचारी काम करत नसल्याची माहिती मला मिळाली आहे. कुवेतमध्ये असलेल्या नाड्राच्या (नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी) कार्यालयात तैनात असलेले कर्मचारी मार्गदर्शन करण्याऐवजी हफ्ते खातात. येथील एक अधिकारी बोगस कागदपत्रे तयार करण्याचे काम करतो, असेही मला समजले आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अधिक सक्रिय असतो. त्यांच्याकडून परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना उत्तम सेवा दिली जाते, असेही इम्रान खान यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या राजदूतांसोबत चर्चा

इम्रान खान यांनी जगभरातील देशांमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या राजदूतांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पाकिस्तानचे राजदूत त्यांच्या कामाबद्दल उदासीन असतात. त्यामुळे विशेष करून मध्य पूर्वेतील सेवांवर परिणाम होतो. मात्र, त्यांनी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.