‘भारत-पाक’ सीमेवर पाकिस्तानची घुसखोरी, जवानांकडून ७ दहशतवाद्यांचा ‘खात्मा’ !

श्रीनगर : काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल पाठविण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला झोप उडाली आहे. एलओसीवर थांबुनथांबून गोळीबार होत असून दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराचा हा कुटील डाव भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे. केरन सेक्टरमधून घुसखोरी करणार्‍या ७ पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर ठार केले आहेत. त्यांचे मृतदेह अजूनही नियंत्रण रेषेत पडून आहेत.

जोरदार गोळीबार चालू असल्यामुळे मृतदेह काढता आले नाहीत किंवा त्यांची ओळख पटली नाही. पुरावे म्हणून सैन्याने ४ मृतदेहांचे उपग्रह फोटो घेतले आहेत. गेल्या २४ तासांत ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काश्मिरच्या शांतता भंग करण्याचा पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि गोळीबाराच्या मदतीने जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सीमेवर लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे. नियंत्रण रेषेच्या दुसर्‍या बाजूलाही पाकिस्तानने अधिक सैन्य तैनात केले आहे. पाकिस्तानकडून या मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असून दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार होत आहे. गेल्या काही दिवसांत सैन्याने सुमारे चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरची शांतता बिघडवण्याचा आणि अमरनाथ यात्रेच्या प्रवाशांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करीत आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर आयईडी, स्निपर आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.