पाकिस्तानी महिला पासपोर्टविनाच पोहचली गोव्यात, स्थानबध्दता केंद्रात ठेवण्याचे आदेश

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन –  पाकिस्तानी नागरीक असलेल्या 27 वर्षीय महिलेची कळंगूट येथून अटकेतून सुटका झाली असली तरी तिला पुन्हा स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत तिने पासपोर्ट दाखवणार नाही, तोपर्यंत तिला बाहेर पडता येणार आहे. सदर महिला पासपोर्ट नसतानाही नेपाळमार्गे भारतात आली आहे.

गोवा पोलीस मुख्यालयात असलेल्या विदेश विभागाकडे त्या महिलेचा विषय पुन्हा आल्यानंतर पुन्हा तिला स्थानबद्धता केंद्रात ठेवण्याचा आदेश संबधित विभागाने दिला आहे. सदर महिलेला 19 जानेवारी रोजी कळंगूट येथे संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ती पाकिस्तानी असल्याचे आढळून आले. परंतु तिच्याकडे पासपोर्टसह कोणतेही अधिकृत कागदपत्र सापडले नसल्याने तिला अटक झाली होती. तिच्यासह तिला ठेऊन घेतलेल्या आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानी महिलेला कळंगूट येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले होते. तिला जामीन मिळाल्याने तिची सुटका झाली. कळंगूट पोलिसांनी तिचा हा विषय विदेश विभागाकडे सोपविला तेव्हा या विभागाकडून तिला पुन्हा स्थानबद्धता केंद्रात ठेवण्याचा आदेश दिला. अटकेतून सुटका झाली असली तरी तिची स्थानबद्धतेतून सुटका झालेली नाही. सदर महिला नेपाळमार्गे पासपोर्ट नसतानाच भारतात आली होती. पासपोर्ट नसल्याने तिला भारतात राहाण्यासाठी व्हीसाही मिळवता आला नाही. दरम्यान विदेश विभागाकडून पाकिस्तान वकालतीला या महिलेविषयी माहिती पुरविण्यात आली आहे.