पाकिस्तान : हिंदू युवती मनिषानं रचला इतिहास, सिंध पोलिस दलात उपअधीक्षक (DSP) पदी झाली निवड

सिंध : वृत्त संस्था – सिंधमध्ये राहणारी मनीषा रोपेटा पहिली हिंदू महिला आहे जी पाकिस्तान पोलिसात डेप्युटी सुपरिटेंडंट पदावर नियुक्त झाली आहे. तिला ही नियुक्ती सिंध पब्लिक सर्व्हिस कमीशनची परीक्षा पास झाल्यानंतर मिळाली आहे. ही परीक्षा पास होणारी सुद्धा ती पहिली हिंदू महिला आहे.

सिंध पब्लिक सर्व्हिस कमीशनकडून याच आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये 152 यशस्वी उमेदवारांमध्ये तिला 16 वे स्थान मिळाले.

26 वर्षीय मनीषा रोपेटाने डॉक्टर होण्याची इच्छा सोडून पोलीस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. मनीषानुसार, तिला काहीतरी वेगळे करायचे होते.

मनीषा डीएसपी म्हणून आपले ट्रेनिंग घेण्याबाबत अतिशय उत्साहित आहे. फावल्या वेळात तिला शायरी करायला आवडते.

पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, मनीषाने म्हटले की, तिला ही परीक्षा पास होण्यासाठी खुप मेहनत करावी लागली, कदाचित इतरांपेक्षा जास्तच. परंतु आता निकाल लागल्यानंतर मी खुप आनंदी आहे.

मनीषाचे कुटुंब एक दशकापूर्वी जैकबाबादहून कराचीत आले होते. मनीषाने फिजियोथिरेपीमध्ये डॉक्टरेट घेतली आहे. घरात सर्वात लहान मुल असलेल्या मनीषाचे कुटुंब सुद्धा मुलीने इतिहास घडवल्याने आनंदी आहे.

मनीषा रोपेटाच्या अगोदर पाकिस्तानच्या उमरकोट जिल्ह्यात आणखी एक हिंदू महिला पुष्पा कुमारीला सिंध पोलिसात असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.