20 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्याला अटक; गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी मागत होते पैसे

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक राजेश सखाराम धुमाळ (वय ५७) आणि पोलीस शिपाई प्रकाश धीरु पवार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या पतीला बाईसर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. या गुन्ह्याची तीव्रता कमी करतो, त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ यांनी पवार याच्याकरवी २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी केलेल्या पडताळणीत आरोपींनी १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना दोघांनाही पकडण्यात आले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाण्याचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील, हवालदार परदेशी, पोलीस अंमलदार लोटेकार, संदेश शिंदे यांनी ही कारवाई केली.