पालघर लोकसभा मतदार संघ पोट निवडणूक 28 मे रोजी

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन

पालघर लोकसभा मतदारसंघाचा पोट निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून 26 एप्रिल रोजी जाहिर केला असून, पोट निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. सोमवार दिनांक 28 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 31 मे रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे, या कार्यक्रमानुसार दि.03 मे 2018 ते दि.10 मे 2018 नामनिर्देशनपत्र दाखल करणे. दि.11 मे 2018 नामनिर्देशन पत्राची छाननी. दि.14 मे 2018 उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक. दि.28 मे 2018 मतदानाचा दिवस. दि.31 मे 2018 मतमोजणीची तारीख आहे.

या निवडणुकीसाठी दि.01 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व मतदार केंद्रावर EVM व VVPATs चा वापर करण्यात येणार आहे. 22- पालघर (अज) लोकसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्राची संख्या 2071 आहे. एकूण पुरुष मतदार 9,03,780 असून स्त्री मतदार 8,20,140 इतर मतदार 86 असे एकूण 17,24,006 मतदार आहेत.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु असून आचारसंहिता पथक, खर्च निरीक्षण पथक, सोशल मीडिया मॉनिटरिंग पथक यांसह विविध पथकांची नेमणूक करण्यात आली असून, याद्वारे आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. आचारसंहिता भंगाबाबत पत्रकारांनीही जागरुक राहून त्याबाबत माहिती द्यावी असे सांगितले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले. यावेळी पेडन्यूज समिती आचारसंहिता व अन्य अनुषंगिक माहितीही देण्यात आली. या पत्रकार परिषदेस निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.