पंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना टोला, तर शिवसेनेला शुभेच्छा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड येथे आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते. त्यावरून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि मेटे या दोघांना टोला लगावला. एकाही जिल्हा नियोजन समिती बैठकीत यांनी उपस्थिती राहून प्रश्न मांडले नाहीत. विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. राजकारण सोडून जिल्ह्याच्या प्रश्नांना त्यांनी वेळ द्यावा. तर, मेटेंबाबत ‘तो त्यांच्या सेन्सॅरिटीचा प्रश्न आहे’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी कोपरखळी लगावल्या. तर शिवसेनेच्या दुष्काळ संपविण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाहनाबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळेच मागचे चार वर्षे टंचाई जाणवली नाही, पाण्यासाठी टँकर लागले नाहीत. यंदा निसर्गानेच अवकृपा केली त्यामुळे टंचाई जाणवत आहे. जलयुक्त बाबत विरोधकांची टीका अभ्यासशुन्य आहे अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाल्या, चारा छावण्यांचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. जिल्ह्याच्या टंचाईबाबत ता. २५ डिसेंबरला स्वतंत्र बैठक घेतली जाईल. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ३२७ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते. प्रत्येक क्षेत्रासाठी जिल्ह्याला भरीव निधी आणला आहे. शे-दोनशे कोटींशिवाय गोष्ट होत नाही. अगदी निधीचा जिल्ह्यात पाऊस पाडल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.