आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! शासकीय रुग्णालयामधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शनिवार (दि.12 डिसेंबर) पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील (Government Hospital) रुग्णांना (patient) मोफत रक्त (Blood) मिळणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केली आहे. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रक्तदान करुन नागरिकांना रक्तदानासाठी आव्हान केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (गुरुवार) दुपारी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी राजेश टोपे म्हणाले की, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रक्रियेसाठी 800 रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम रावबण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

तसेच, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे 344 ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम सुरु आहे’ आणि सोशल डिस्टंसिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या साऱ्यामुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलनात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे टोपे म्हणाले.

रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही. त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.