आंबोलीत पट्टेरी वाघाचे दर्शन ! वन विभागाने लावलेल्या कॅमेर्‍यात वाघ-वाघीण कैद

सावंतवाडी : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एकेकाळी वाघांचे वास्तव होते. अनेक राजे महाराजे या परिसरात शिकारीला येत असत. मात्र, काळाच्या ओघात वाघ नामशेष झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीच्या जंगलात एकेकाळी ५ वाघांचे अस्तिव होते. पण, नंतर ही संख्या शुन्यावर गेली होती. आंबोली हिरण्यकेशी परिसरातील ग्रामस्थांच्या दाव्यानंतर वन विभागाने या परिसरात कॅमेरे लावले होते. त्यात एका वाघ व वाघिण कॅमेर्‍याने टिपली आहे.

हा पट्टेरी वाघ आंबोली हिरण्यकेशी जंगल भागात असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले आहे.दोन दिवसांपूर्वी आंबोली येथील एका शेतकर्‍याचा गाईचा पडशा पाडण्यात आला होता. या पट्टेरी वाघाने गाईला मारले, असा दावा शेतकर्‍याने केला होता. मात्र, वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर त्यांनी या परिसरातील जंगलात कॅमेरे लावले. हिरण्यकेशी जंगलात लावलेल्या कॅमेर्‍यात पट्टेरी वाघ दिसून आला आहे. त्याच्याबरोबर एक वाघीणही दिसत आहे.

राधानगरी ते तिलारी घाट परिसरात काही वर्षांपासून पटेरी वाघ आपले अस्तित्व दाखवत होता. त्यामुळे सह्याद्रीचा हा पट्टा आता पट्टेरी वाघाचे राज्य झाले आहे. काही वर्षापूर्वी आंबोली ते पाटगाव परिसरात ब्लॅक पॅथर आढळून आला होता. आंबोलीचा घाट, तेथील धबधबे हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. पावसाळ्यात या धबधब्याखाली भिजण्यासाठी हजारो पर्यटक आंबोलीत येत असतात.