पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले; मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये ७३ पैसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. कर्नाटकमध्ये प्रचार संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. पेट्रोलच्या दराने मंगळवारी (दि.२२) आतापर्यंतची उच्चांकी गाठली.

त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे इंधन दर भारतात वाढले आहेत. मात्र दरवाढीला कारणीभूत यापेक्षाही महत्त्वाचं कारण आहे, केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आणि विविध राज्यांमध्ये लागणारे कर आणि सेस.