पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या दोन दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर आता आणखी इंधन दरात आणखी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे लॉकडाउनचे संकट वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या दीड आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात 7 टक्क्यांची कपात झाली आहे. या स्वस्ताईचा फायदा सामान्य माणसाला मिळण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

याबाबत आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, कोरोना संकटामुळे तेलाची मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. मागील एक ते दीड आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 7 टक्के घसरण झाली आहे. मागणी कमकुवत झाल्यास किंमत आणखी खाली येण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात अशीच घसरण होत राहिली, तर सर्वसामान्यांना याचा फायदा मिळू शकेल. तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी कपात करण्याची शक्यता आहे.