Coronavirus : Pfizer कंपनीची मोठी घोषणा, म्हणाले – ‘भारताला 7 कोटी डॉलर्सची औषध पाठवणार’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. या दरम्यान, भारताला मदत करण्यासाठी अनेक देशांनी हात पुढे केला आहे. अशातच कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या Pfizer या कंपनीने मदत केली आहे. फायझर कंपनीने तब्बल 7 कोटी अमेरिकन डॉलर्सचे औषध भारतात पाठवणार आहे. तसेच लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ अलबर्ट बॉरला यांनी दिली.

देशात कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी Pfizer ने मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनीचे सीईओ अलबर्ट बॉरला म्हणाले की, आपल्या लसीला भारतात परवानगी देण्यासाठीही सरकारशी चर्चा सुरू आहे. आमचा अर्ज महिन्याभरापूर्वीच सादर केला आहे. परंतु लसीची भारतात नोंदणी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लसीला मंजुरी मिळाल्यास देशात त्याच्या वापरास सुरूवात करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान देशात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात कोरोनामुळे 3417 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.