फोन टॅपिंग प्रकरण : मुंबई पोलिसांनी हैदराबादला जाऊन IPS रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला

पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांच्या चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्यास वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे या प्रकरणात बीकेसी सायबर पोलिसांचे पथक नुकतेच हैदराबाद येथे जाऊन शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस हे तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. तर यापूर्वी चौकशीला गैरहजर राहिल्याने रश्मी शुक्ला याना मुंबई सायबरने 2 वेळा समन्स बजावले होते.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त शुक्ला यांनी काही प्रमुख व्यक्ती अन् मंत्र्यांचे फोन टॅप करून पोलीस दलात ट्रान्सफर पोस्टिंगचे रॅकेट चालत असल्याचा अहवाल तयार केला होता. या प्रकरणात भारतीय टेलिग्राफ अ‍ॅक्ट कलम 30 माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट 05 नुसार बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुह्याच्या तपासासाठी सायबर पोलिसांनी रश्मी शुक्लांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत. कोरोना काळात आपल्याला मुंबईला येणे शक्य नसल्याने ई-मेलद्वारे प्रश्न पाठवावे अशी मागणी त्यांनी केली होती. पोलीस चौकशीला बोलावत असल्याने शुक्लानी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शुक्लांना पोलिसांना जबाब नोंदवण्यास परवानगी दिली होती. शुक्ला यांचा जबाब त्याच्या वकिलासमोर नोंदवून त्याची व्हिडीओग्राफी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार सायबर पोलिसांचे पथक हैदराबादला जाऊन शुक्लांचा जबाब नोंदवला आहे.