MP : इमरती ‘देवी’ तर कमलनाथ ‘महिषासूर’, ‘आयटम’ वादावर ‘तो’ फोटो व्हायरल

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि पोटनिवडणुकीतील (mp by election) उमेदवार इमरती देवी (Imarti Devi) यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी आयटम असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी कमलनाथांवर जोरदार निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर देखील या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. आयटम वादावरुन सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये इमरती देवींना ‘देवी’ तर कमलनाथ यांना ‘महिषासूर’ (mahishasur) बनवले आहे.

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये इमरती देवी यांना देवीच्या (महिषासूर मर्दिनी) रुपात दाखवण्यात आले आहे. तर देवीच्या पायाजवळ कमलनाथ यांना महिषासुराच्या रुपात दाखवण्यात आले आहे. डबरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर आरोप करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) नेते कमलनाथ यांची जीभ घसरली. इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख आयटम असा केला. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कमलनाथ यांचं स्पष्टीकरण
एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं.1. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते आयटम नं.1. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरलेला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवलं नाही. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत.

ते पुढे म्हणले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.