यवतमाळपाठोपाठ पंढरपुरमधील पोलिओ लस देतानाचा धक्कादायक प्रकार

पंढरपूर : यवतमाळमध्ये पोलिओ लस देण्याऐवजी सॅनिटाझर देण्यात आल्याचा प्रकार समोर आला असतानाच आता पंढरपूरमध्येही परिचारिकांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. पोलिओचा ड्रॉपसोबत प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटात गेला आहे.
ही घटना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे. ३१ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंगणवाड्यामध्ये लीसकरणाची सोय केली होती. भाळवणी येथे राहणारे माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी भाळवणी आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. बाळाला लस देत असताना ड्रॉपच्या बाटलीचा प्लास्टिकचा तुकडासुद्धा बाळाच्या तोंडात गेला. हा तुकडा बाळाच्या पोटात गेल्याने त्याची प्रकृती खालावली आहे. बाळाला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी बाळाला औषध दिले आहे. आता दोन दिवसांनी त्याची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.