PIL Against DJ | डीजे विरुद्ध सुनील माने व अजय भोसले यांची जनहित याचिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PIL Against DJ | गणेश उत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रात डीजे आणि लेझरचा अनावश्यक वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. अनेक लोकांना याचा त्रास झाला. गणेश उत्सवानंतर याबातातच्या अनेक बातम्या समोर आल्या. त्यामुळे सर्वप्रकारांच्या उत्सवातील डी.जे आणि लेझर वर कायम स्वरूपी बंदी आणावी म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. प्रख्यात कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे (Adv Asim Sarode) हे न्यायालयात याबाबत युक्तिवाद करणार असल्याची माहिती कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील माने तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर सहसंपर्क प्रमुख श्री अजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. (PIL Against DJ)

या पत्रकार परिषदेला सुनील माने (Sunil Mane), अजय भोसले (Ajay Bhosale) यांच्यासह आंबेडकर जयंती मध्ये डीजे बंदी करणारे मा. नगरसेवक प्रदीप गायकवाड, कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. (PIL Against DJ)

यावेळी सुनील माने म्हणाले, डीजेमुळे काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे, अनेकांना यामुळे कायमचे बहिरेपण आले आहे. लेझरमुळे अनेकांची दृष्टी गेली. गणेशउत्सवानंतर या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. त्यामुळे सार्वजनिक सण उत्सवात, सामाजिक तसेच वैयक्तिक कार्यक्रमात डीजे आणि लेझरचा वापर टाळावा यासाठी आम्ही मोहीम सुरु केली. याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून व्हावी यासाठी आम्ही एका बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीसाठी आम्ही पुण्यातील अनेक मान्यवरांना आमंत्रित केले होते. बाबासाहेब हे जगासाठी ज्ञान आणि बुद्धीचे प्रतिक आहे त्यामुळे डीजे आणि लेझरचा वापर न करता समाजिक उपक्रमांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यातील आंबेडकरी जनतेने याला मोठ्या प्रमाणावर पाठींबा व्यक्त केला. या अनावश्यक गोष्टींचा वापर बंद व्हावा यासाठी लोकचळवळी सोबतच कायद्याने यावर बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत आम्ही ही याचिका दाखल केली आहे.

अजय भोसले म्हणाले, सध्या डीजे आणि लेझरमुळे लोकांच्या आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आम्ही यावर सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. दरवर्षी गणेश उत्सवामध्ये डीजे मुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. लेझर मुळे गेल्या काही वर्षात अनेकांना डोळ्याचे गंभीर आजार झाले आहेत. याचे होणारे दुष्परिणाम पाहता हे थांबणे गरजेचे होते. याची सुरुवात पुणे शहरातून आणि ज्ञानाचे प्रतिक असणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंती पासून करावी असा विचार करून आम्ही याविरोधात संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आम्ही ही जनहित याचिका दाखल केली आहे.

प्रदीप गायकवाड म्हणाले, यावर्षीची आंबेडकर जयंती आम्ही सर्वसामान्यांना,
ज्येष्ठ नागरिकांना, होणाऱ्या त्रासाबद्दल विचार करून डीजे मुक्त पद्धतीने साजरी केली.
हीच रक्कम आम्ही स्थानिक नागरिकांना आम्ही हातगाड्या, ज्येष्ठांना आधारासाठी काठ्या वाटण्यासाठी वापरली.
त्याचप्रमाणे याच पैशातून आम्ही १० वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,
समाजपयोगी साहित्य तसेच गरजू लोकांना अन्नधान्याचे कीट वाटले.
लोकांनी याचे उस्फुर्तपणे स्वागत केल्याने आम्ही प्रतिवर्षी असेच उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ॲड. असीम यांनी सुनील माने आणि अजय भोसले यांनी बाबासाहेब आंबेडकर
यांच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जयंतीत डीजे बंदीचा निर्णय घेतला त्याबद्दल
त्यांचे अभिनंदन केले. याचिकेविषयी माहिती सांगताना ते म्हणाले,
उत्सवातील ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
डीजे तसेच स्पीकरमध्ये बेकायदेशीररित्या लावलेले मिक्सर यामुळे मोठा गोंगाट होतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, लेझर आणि प्लाजमा लाईट यांच्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो त्यामुळे हे बंद झाले पाहिजे. त्याचप्रमाणे पर्यावरणाला हाणी पोहचवणारे फ्लेक्सवर सुद्धा कायद्याने बंदी आणली पाहिजे याकरिता ही याचिका दाखल केली आहे. उत्सवी ध्वनी प्रदुषणाबद्दल पोलीस आणि प्रशासनाने घेतलेल्या मवाळ भूमिकेबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राज्याचे पोलीस महासंचालक, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच पुणे महानगरपालिका यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

आंबेडकर जयंती मध्ये डीजे बंदीचा निर्णय अंमलात आणणारे मा. नगरसेवक प्रदीप गायकवाड
यांचा यावेळी सुनील माने यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती, एका मंत्र्याच्या…
संजय राऊतांच्या आरोपाला हसन मुश्रीफांचे उत्तर