दिल्लीत ‘लॉकडाऊन’ची सक्तीने अंमलबजावणी करा, न्यायालयात जनहित याचिका दाखल

नवी दिल्ली : कोरोना संदर्भात दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन आप सरकारला येथे सक्तीने लॉकडाऊन लागू करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वकिल अनिर्बान मंडल आणि त्यांचे सहकारी पवन कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, दिल्ली सरकारने स्वत: मान्य केले आहे की, दिल्लीत जूनच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरस संसर्गाची सुमारे एक लाख प्रकरणे समोर येतील आणि जुलैच्या मध्यावर सुमारे 2.25 लाख आणि जुलैच्या शेवटी 5.5 लाख प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

याचिकेत दिल्ली सरकारला हे निर्देश देण्याची विनंती केली आहे की, त्यांनी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ आणि महामारी रोगांच्या तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यावर विचार करावा, ज्यातून संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेचा आराखडा तयार करता येईल.

याचिकाकर्त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करताना म्हटले आहे की, यापूर्वीच्या लॉकडाऊनच्या दरम्यान संसर्गाची प्रकरणे वाढण्याचा दर कमी होता.

याचिकेत दावा केला आहे की, राष्ट्रीय राजधानीमध्ये लोकांचे येणे आणि सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करणे, धार्मिक स्थळे, मॉल, रेस्टॉरन्ट आणि हॉटेल उघडण्याने व्हायरस वेगाने पसरला आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसच्या रोजच्या प्रकरणांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

याचिकेत हॉस्पिटलमध्ये योग्य बेड, व्हेंटिलेटर , आयसीयू वॉर्ड आणि तपासणी केंद्रांची कमतरता असल्याचा दावा केला आहे.