पिंपरी : तळवडेत जाहिरातीचे होर्डिंग कोसळले ; सुदैवाने जीवीत हानी नाही

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईन

मागील महिन्यात वाकड येथील जाहिरातीचे होर्डिंग कोसळून एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला होता. तर मोशी येथील घटनेत एका चहा विक्रेत्याला जीव गमवावा लागला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमरास तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकात एका जाहिरात कंपनीचे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग एका उच्चदाब विद्यूत वाहिन्यांवर कोसळले. यामध्ये खांब वाकले असून वीज ताराही तुटल्या आहे. सुदैवाने विद्युत प्रवाह बंद असल्याने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. जर विद्युत पुरवठा सुरु असता तर मोठी दुर्घटना घडली असती. आजच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंगा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये होर्डिंग कोसळून दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. शहरात अनेक ठिकाणी जाहिरातींचे होर्डिंग उभरले जात आहेत. मात्र हे होर्डिंग उभारताना पुरेशी दक्षता घेणे गरजे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. उभारलेल्या फलकांना परवानगी देताना संबंधीत यंत्रणेने त्याची तपासणी करणे गरजे आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत.

पालिकेतील आकाशचिन्ह विभागाने शहरातील अनधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंगवर कारवाई करुन ते काढून टाकण्याची मागणी होत आहे.तसेच उंचावर लावलेले फलक वाऱ्याच्या दाबामुळे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यातून सहज हवा निघून जाईल याची दक्षता घ्यावी. जुने व फाटलेले फलक ताबडतोब काढून टाकावेत, अशी मागणी होत आहे.