Coronavirus : इंग्लंडहून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या 3 प्रवाशांमध्ये नवीन ‘कोरोना’चा स्ट्रेन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाची स्थिती सुधारत असताना इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. इंग्लंडहून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी तीन प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 146 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 91 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 146 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 97 हजार 442 वर पोहचली आहे. आज 91 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 93 हजार 997 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरातील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण निगडी येथील आहेत. आतापर्यंत शहरात 2502 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1767 शहरातील तर 735 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 639 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 70 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 71 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तिघांचा UK स्ट्रेन अहवाल पॉझिटिव्ह
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 7 प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करता जिमोन सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 जणांचे अहवाल UK स्ट्रेन पॉझिटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल प्रलंबित असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.