पिंपरी : Lockdown असताना घरातून जप्त केल्या 518 दारुच्या बाटल्या, पोलिसांकडून 6 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. या काळात बेकायदेशीरपणे घरातून दारु विक्री करण्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

करण भरत सोनार (वय २३), अर्जुन भरत सोनार (वय २०), भरत अमर सोनार (वय ४५), दिपेश भरत सोनार (वय १९), मनिषा भरत सोनार (वय २२), गीता भरत सोनार (वय ४०, सर्व रा. निगड प्राधिकरण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुळचे नेपाळमधील आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
शहरात लॉकडाऊन सुरु असल्याने दारु दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे दारु विक्री सुरु आहे. सोनार हे घरातून दारु विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलीस प्राधिकरणातील पी एफ कार्यालयाशेजारील सोनार यांच्या घरी गेले. त्यांना लोकांना दारु विक्री करताना पकडण्यात आले. त्यावेळी करण सोनार याने फिर्यादी यांची गचंडी पकडून त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच कारवाई करु नये, म्हणून आरडाओरडा करुन इतरांनी पोलिसांशी झटापटी करुन सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी त्यांच्या घरातून तब्बल ९७ हजार १४५ रुपयांच्या ५१८ विदेशी दारु व बियरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे याबरोबरच दारुूबंदी आणि साथ रोग अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर रहाटणी येथील कोकणे चौकाजवळील मोकळ्या जागेत दारु विक्री करणार्‍या निरंजन देसाईकडून पोलिसांनी ३ हजार २५० रुपयांच्या विदेशी दारु व बियरच्या १७ बाटल्या जप्त केल्या. डुडुळगाव येथील हॉटेल घे भुर्रर्रका येथून १ हजार ४१६ रुपयांच्या देशी विदेशी दारुच्या २३ बाटल्या जप्त केल्या. चाकण तळेगाव रोडवरील चाकण वाईनमागे दारु विक्री करणार्‍या राजेंद्र घाडगे याच्याकडून ४४ हजार ९० रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या व रोख रक्कम जप्त केली. डुडुळगाव येथील हॉटेल कल्याणी येथून १ हजार ५६० रुपयांच्या १० विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.