कोट्यावधीचा घोटाळा करणारे ‘संस्कार ग्रुप’चे ‘मास्टर माइंट’ जोडपे अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांना चुना लावून फरार झालेल्या संस्कार ग्रुपच्या मास्टर माईंड तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रात्री इंदुर येथून अटक केली आहे.

मास्टर माईंड वैकुंठ कुंभार, पत्नी राणी कुंभार व त्याचा मेव्हणा रामदास शिवले यांना अटक केली आहे. तर अजय लेले, शिवाजी ढमढेरे व कमल शेळके अशी कारागृहात असलेल्या संस्कारच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

दामदुप्पट व्याजाच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्या करोडो रुपयांच्या ठेवी गुंतवणूकदारांना परत न दिल्याप्रकरणी जानेवारीमध्ये २०१७ मध्ये दिघी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) अनुसार संस्कार ग्रुपविरोधात गुन्हा दाखल झाला. त्या वेळी संस्कार ग्रुपचा संस्थापक वैकुंठ प्रल्हाद कुंभार, राणी वैकुंठ कुंभार (दोघेही रा.आळंदी, ता. खेड) कमल ज्ञानेश्‍वर शेळके (रा. वडमुखवाडी, ता. हवेली) यांचा सत्र व उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तेव्हापासून हे तिघेही फरारी होते. त्यातील कमल शेळके यांना दिघी पोलिसांनी २१ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करून सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने शेळके यांना अगोदर पोलिस कोठडी व नंतर कारागृहात रवानगी केली.

दरम्यान, गुन्ह्याची व्यप्ती वाढल्याने दिघी पोलिसांकडून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने संस्कारच्या महाराष्ट्र व इतर राज्यातील मालमत्तेचा शोध घेऊन त्या जप्त केल्या. पुढे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती झाल्याने संस्कारचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने लागलीच तपासाची चक्के फिरवत अजय लेले, शिवाजी ढमढेरे या दोन संस्कारच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. तर रात्री या प्रकरणीतील मुख्य आरोपी असलेल्या कुंभार दांपत्यालाही अटक करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com