पिंपरी : कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले 60 लाख रुपये स्वयंपाक्याने लांबविले

पिंपरी : एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर असणार्‍या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेवलेले ६० लाख रुपये स्वयंपाक्याने चोरी करुन पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

अनोदकुमार राजकुमार यादव (वय २८, रा. कुमाडान्ड, सदरापूर, बाराबंकी, उत्तरप्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अजित संजयकुमार राजहंस (वय ३१, रा. महिंद्रा अ‍ॅटीय, नेहरुनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अजित राजहंस हे एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन व्हिडिजनमध्ये नोकरीला आहेत.

ते आणि इतर ३ इंजिनियर यांची राहण्यासाठी सोय कंपनीने एका फ्लॅटमध्ये केली आहे़ यांच्यासाठी जेवण बनविण्यासाठी अनोदकुमार यादव याला कंपनीने नेमले होते. तो तेथेच रहात होता. अजित राजहंस यांनी कामगारांचे पगारासाठी ६० लाख रुपये आणून बेडरुममधील लाकडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवले होते. २८ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान फ्लॅटवर कोणी नसताना यादव याने बनावट चावीने कपाट व लॉकर उघडून त्यातील ६० लाख रुपये चोरले व तो पळून गेला आहे.