Indian Railways : प्रायव्हेट होणार का भारतीय रेल्वे? खासगीकरणाबाबत पीयूष गोयल यांनी दिली मोठी माहिती, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रेल्वेच्या खासगीकरणाबाबत आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोठी माहिती दिली आहे. पीयूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, रेल्वे भारताची संपत्ती आहे, तिचे कधीही खासगीकरण होणार नाही. ते म्हणाले, प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, रेल्वेद्वारे अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, अशा कामांसाठी खासगी क्षेत्राची गुंतवणुक देशहितासाठी असेल.

लोकसभेत 2021-22 साठी रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदानाच्या मागणीवर चर्चेला उत्तर देताना पीयूष गोयल म्हणाले, दुर्दैव्य आहे की, अनेक खासदार खासगीकरण आणि कॉर्पोरेटायजेशनचा आरोप करतात. भारतीय रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नाही.

सोमवारी चर्चेदरम्यान काँग्रेसचे जसबीर सिंह गिल, आययूएमएलचे ईटी मोहम्मद बशीर यांच्यासह काही सदस्यांनी रेल्वेचे खासगीकरण करण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न असल्यासंबंधी टिप्पणी केली होती.

रेल्वेमंत्री म्हणाले, रस्ते सुद्धा सरकारने बनवले आहेत तर कुणी म्हणते का, की यावर केवळ सरकारी गाड्या धावतील. रस्त्यावर सर्वप्रकारची वाहने धावतात, तेव्हाच प्रगती होते आणि तेव्हाच सर्वांना सर्व सुविधा मिळतात. मग रेल्वेत असे होऊ नये का? प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळू नयेत का?

खासगी क्षेत्र करणार विकास

त्यांनी म्हटले की, मालवाहक ट्रेन धावण्यासाठी जर खासगी क्षेत्र गुंतवणूक करणार असेल तर यावर विचार होऊ नये का. मागील सात वर्षात रेल्वेत लिफ्ट, एस्केलेटर इत्यादी सुविधांच्या दृष्टीने अभूतपूर्व कामे करण्यात आली. जर आपल्याला अत्याधुनिक जागतिक दर्जाची रेल्वे बनवायची असेल तर मोठ्या निधीची आवश्यकता असेल.