आगामी 1000 दिवसांमध्ये सगळ्या 6 लाख गावांमध्ये पसरवलं जाईल ऑप्टिकल फायबरचं जाळं : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश आज 74वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, की 2014 पूर्वी देशातील केवळ 5 डझन पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या होत्या. येत्या 1000 दिवसात देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने जोडले जाईल.

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, मागील पाच वर्षात देशातील दिड लाख पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत. येत्या एक हजार दिवसात हे लक्ष्य पूर्ण करण्यात येईल. येत्या 1000 दिवसात देशातील प्रत्येक गाव म्हणजे 6 लाख गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जातील.

नव्या सायबर धोरणाबाबत पीएम मोदी म्हणाले, भारत याबाबतीत सतर्क आहे, आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार आहे आणि नवनवीन व्यवस्था सुद्धा सतत विकसित करत आहे. देशात नवीन राष्ट्रीय सायबर संरक्षण धोरणाचा मसुदा तयार केला आहे.

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील सामान्य नागरिकाची मेहनत, त्याच्या कष्टाला तोड नाही. मागील 6 वर्षात देशात मेहनत करणार्‍या लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या. कोणताही भेदभाव न करता पारदर्शकपणे सर्व लोकांना योजनांचा लाभ दिला आहे.

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत, आधुनिक भारताच्या निर्मितीत, नव्या भारताच्या निर्मितीत, समृद्ध आणि समाधानी भारताच्या निर्मितीत, देशातील शिक्षणाचे मोठे महत्व आहे. याच विचारासह देशाला एक नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण मिळाले आहे.