PMRDA कडून वाघोली, मांजरी, हिंजवडी, माण आणि भुकूममधल्या 13 राखीव भूखंडाचा लिलाव, नागरिकांचा तीव्र विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हिंजवडी, वाघोली, मांजरी, भूकूम, माण मधील एकूण 13 भूखंडाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पीएमआरडीएने एक सूचना प्रसिद्ध केली असून त्यानुसार पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर दिल्या जाणार आहेत. त्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मात्र सोयी सुविधा न देता त्यासाठी राखीव ठेवलेल्या या जागांचा लिलाव नेमका कशासाठी असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. विरोध नोंदवणारी पत्र नागरिकांनी पीएमआरडीएला पाठवली आहेत.

पीएमआरडीए जागा भाडेतत्वावर देत 30 कोटी रुपये कमावण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुळात साधारण वर्षाकाठी 300 ते 400 कोटी रुपये उत्पन्न वेगवेगळ्या प्रकल्पाकडून मिळत असेल तर हा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न वाघोली येथील रहिवाशी संजीव पाटील यांनी उपस्थित केला आहे. वाघोलीत कचरा प्रकल्पांची पिण्याच्या पाण्यासाठी सोय करण्याची आणि रस्ते बांधण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. या जागा दवाखाने तसेच क्रीडांगणासाठी वापरणे गरजेचे आहे, असे असताना पीएमआरडीए जागांचा लिलाव कशासाठी करत आहे हे समजत नाही. तर रविंद्र सिन्हा म्हणाले की, पीएमआरडीएकडून त्यांच्या हद्दीतील जागांचा विकास आराखडा अद्यापही करण्यात आला नाही. जिथे लिलाव करण्याचा निर्णय घेतला त्या भागामध्ये कचरा प्रकल्प पाणीपुरवठा आदी सुविधा देखील नाहीत. मग पीएमआरडीए कडून हा निर्णय नेमका कशासाठी घेतला जातोय असा सवाल उपस्थित होत आहे.