शेतकऱ्यांना चंदनतस्कर ठरवून निलंबित PSI ने उकळले सव्वा लाख रुपये

पाथरी (जि. परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन – शेत धुऱ्यावर उगवलेले चंदन शेतीकामासाठी 1200 रुपयांना विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चंदन चोर ठरवून त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये पाथरी पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षकांनी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जैतापूरवाडी येथील शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.

टोपाजी कोरके असे निलंबित केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. आर्थिक व्यवहारप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्यांच्यावर काही दिवसापूर्वीच निलंबनाची कारवाई केली आहे. पाथरी तालुक्यातील जैतापूरवाडी येथील शेतकरी किशन लक्ष्मण यादव यांनी विकलेली झाडे तोडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतमालक किशन यादव आणि शेतात काम करणारे उमेश खुणे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर मुंजाभाई टाकळकर यांच्या मध्यस्थीने 1 लाख 20 हजार रुपये घेतले. शेतकरी गरीब कुटुंबातील असल्याने ग्रामस्थांनी ही रक्कम जमा करून दिली होती.