‘त्या’मुळे पोलिसांची गाडी पेटविली ; डीवायएसपीसह पोलीस निरीक्षक जखमी

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – गायीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे. लोकांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर हे जखमी झाले आहेत. इतर गाड्यांवरही दगडफेक झाली असून त्यात एका एस.टी. बससह काही गाड्या फुटल्या आहेत.

rasta roko on Mumbai Goa Highway violent mob beats policemen

गेले काही दिवस लोटे परिसरात गोवंश हत्येची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाळत ठेवली होती. आज शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी एक गाडी पकडली. त्यात गायी होत्या. मात्र गाडीतील लोक बंदुक आणि तलवारीचा धाक दाखवून पळून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी महामार्ग अडवण्यात आला आहे.

दोन दिवस सुट्टी असल्याने महामार्गावर वर्दळ अधिक आहे.

या रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक गाड्या अडकल्या आहेत. लोकांना बाजूला करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी नांदेडकर यांना धक्काबुक्की केली. तेवढ्यावरच न थांबता लोकांनी पोलिसांची गाडीही पेटवून दिली.

यावेळी झालेल्या दगडफेकीत एका एस. टी. बस सह अन्य काही गाड्याही फुटल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर गंभीर जखमी झाले असून दगडफेकीत खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांची प्रकृतीही गंभीर आहे. संतप्त जमावाने पोलीस निरीक्षक, तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.