पुण्यात रेल्वे समोर उडी मारून पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संगम पुलाजवळ रेल्वेसमोर उडी मारून एका पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. साजन सानप (३७) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला खबर मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. साजन सानप हे आंबोली पोलिस ठाण्यात कार्यरत होते अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सानप यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीची दाखल घेत पोलिसांनी त्याला कोठडीत ठेवले होते. कोठडीतून पळून जाऊन त्याने थेट पुणे गाठले आणि आज त्याने पुण्यातील  संगम पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
सानप विरोधात तक्रार

दरम्यान सानप विरोधात केलेल्या तक्रारीत संबंधित महिलेने म्हंटले आहे की, ‘सानप आणि त्याचे मित्र आपल्याला सातत्याने त्रास देत होते. सानपने आपल्यावर अनेकदा बलात्कारही केला आहे. त्याने माझ्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.’ त्यामुळे सानपवर भादंवि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.