जत तालुक्यातील गांजाची शेती उध्वस्त करण्याचे पोलीस अधिक्षकांचे आदेश

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील करजगी येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे अडीच कोटी रुपयांच्या गांजा जप्त केला. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्याचे आणि तालुक्यातील गांजाची शेती, विक्री उध्वस्त करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी उमदी पोलिसांना दिले आहेत. अधिक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी करजगी येथे ऊसाच्या शेतात गांजाची लागवड करणारे महेश उर्फ पिंटू पट्टणशेट्टी आणि त्याचा भाऊ श्रीशैल यांना शोधण्यासाठी जत तालुक्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.

उमदी पोलिसांनी जत तालुक्यातील करजगी, तिकोंडी, सुसलाद, भिवर्गी या ठिकाणी छापे टाकले. परंतु पट्टणशेटी बंधू पोलिसांच्या हाती लागले नाही. उमदी पोलिसांकडून या दोघांचा शोध सुरु असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जत तालुक्यातील गांजाची शेती, विक्री उध्वस्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

करजगी येथे गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आल्याची माहिती जतचे पोलीस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे मिळाली होती. त्यानुसार वाकुडे यांच्यासह उमदीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भगवान शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने रविवारी सकाळीच करजगीत पट्टणशेट्टी बंधूंच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी दीड एकर ऊसामध्ये गांजाची शेती करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीसांनी पट्टणशेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळताच दोघेही पसार  झाले आहेत. करजगीपासून काही अंतरावर पट्टणशेट्टी यांचे शेत आहे. ऊसाच्या पीकात अंतरपीक म्हणून त्यांनी गांजाची झाडे लावली होती.गांजाची पाच ते दहा फूट उंचीची झाडे असल्याने सकाळपासून गांजाची झाडे काढण्याचे काम सुरू होते. या गांजाच्या झाडांचे वजन 1 हजार 350 किलो भरले आहे. त्याची बाजारभावानुसार अडीच कोटी रूपये किंमत होत असल्याचे सांगण्यात आले.