घारापुरी लेण्यातील ‘सदाशिव’

पोलीसनामा ऑनलाईन – आपली प्राचीन भारतीय संस्कृती,कला, स्थापत्य, इतिहास याचा अभ्यास करत असताना भारतातील अनेक ठिकाणांना, वारसा स्थळांना भेट देत असताना घारापुरीतील गिरीस्थापत्याचा उत्कृष्ट कलाविष्कार असलेली इसवी सनाच्या सहाव्या शतकातील कोकण मौर्य काळात निर्मिली गेलेली ‘शैवलेणी’ पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला.

 

मुंबई जवळील घारापुरी या बेटावर जाण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ पासून मोटारबोटीने खाडीतून घारापुरी बेटावर पोहचले. तेथून लेण्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायी चालत जाणे व टॉयट्रेन या दोन पर्यायातून कमी वेळेत पोहोचेल अशा टॉयट्रेनचा पर्याय निवडून मी पायथ्यापर्यंत पोहोचले. तेथून दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य लेणी जवळ पोहोचले…या घारापुरीचे प्राचीनत्वाचे साक्षीपुरावे देणारे उत्खलनीय पुरावे ; प्राचीन नाणी, मातीची भांडी, वस्तु यांचे अवशेष सापडले आहेत. सातवाहन काळातील “घारापुरी'” हे महत्वाचे व्यापारी असल्याने रोम, ग्रीक अरब व्यापारी या बंदराशी संपर्क ठेवून होते. भौगोलिक रचना व व्यापारी जलमार्गामुळे तत्कालीन गुप्त, कलचुरी, मौर्य या सारख्या राजघराण्यांची या बेटावर ताबा मिळवण्याकरिता चुरस असे.

 

मुख्य लेण्याजवळ पोहचताच डोळ्यासमोर गिरिस्थापत्याचा उत्कृष्ट कलाविष्कार पाहून प्रवासाचा आलेला थकवा जाऊन मन आनंदुन गेले.

 

भौगोलिक परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास करून केवळ छन्नी हातोड्याच्या साह्याने बेसॉल्ट दगडाचा डोंगरमाथा कोरत कोरत पायथ्याशी येत असताना भव्य शिल्प सौंदर्याने नटलेले शिल्पपट, भव्य चौरस विस्तर्ण मंडप, त्यात कलाकुसर विरहित भिंती, प्रदक्षिणापथ अशी कला समृद्ध लेणं पाहून या लेण्याविषयी व भारतीय स्थापत्यचाअभिमान वाटला.

शैव संप्रदायाचे आराध्य दैवत ‘शिव’. यास ही लेणी समर्पित आहेत. तत्कालीन पाशुपत संप्रदायाच्या परंपरेनुसार साधकाला शिवप्राप्तीसाठी त्या मार्गावरून मार्गस्थ होतानाचे टप्पे शिवलीलांच्या शिल्पपटातून दाखवलेले आहे. या शिल्पपटात अर्धनारीनटेश्वर शिल्प, गंगावतरण शिल्प, कल्याणसुंदर शिल्प, रावणानुग्रह, अंधकारसूर वध, शिवपार्वती द्युतक्रीडा शिल्प, नटराजशिव लखुलीश आणि सदाशिव असे एकूण नऊ शिल्पपट असून प्रत्येक शिल्प उलगडून सांगण्याची एक वेगळी लेखमाला होऊ शकते तेव्हा या लेणीतील सर्वात जास्त मला भावलेली, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिने आणि कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण , सदाशिवाची महाराष्ट्रात सर्वप्रथम कोरली गेलेली मूर्ती, अखिल जगतात तोड नसलेली, विशालकाय सालंकृत अशी त्रिमूर्ती म्हणजे सदाशिवाची होय. शिव याला जेव्हा चार वा पाच तोंडे असतात तेव्हा त्याला सदाशिव असे म्हणतात. पण घारापुरी येथील सदाशिव मूर्तीस दृश्य तीन मुख आहेत. ही मूर्ती लेण्यातील सभा मंडपातील मागील भिंतीत मधोमध कोरलेली आहे. आधी या मूर्तीस महेश मूर्ती म्हणून ओळखत..

विख्यात अभ्यासक गोपीनाथराव यांनी ग्रंथाच्या आधारे ही मूर्ती ब्रम्हा विष्णू महेशाची नसून ती सदाशिवाची आहे हे सांगितले याला पाश्चात पंडिता स्टेला कॅम्बरिश यांनीही त्याला दुजोरा दिला आणि आज आपण तिला सदाशिव मूर्ती म्हणून ओळखतो.
घारापुरीतील सदाशिवाला तीन दृश्य मुख असून त्यातील दक्षिणेकडे मुख अघोराचे ,पूर्वेचे तत्पुरुषाचे, उत्तरेकडील वामदेवाचे दाखविलेले आहे. चौथे मुख सद्योजाताचे मागे गृहीत असते.

पाचवे मुख सदाशिवाच्या माथ्यावर असते. अघोराच्या चेहऱ्यावरील भाव आक्रसलेल्या भुवया , नाकाचा बाग,
हनुवटीची ठेवण, तृतीय नेत्र, डोक्यावर मुकुटातील व हातातील नाग, सर्प कुंडल यातून त्याचे भीतीदायक रौद्ररूप
जाणवते. तर तत्पुरूषाचा चेहरा शांत, सात्विक ,प्रसन्न अभयगर्भ असा असून वामदेवाचा चेहरा कोमलता दर्शविणारा,
हातातील कमळ पावित्र्याचे भाव प्रकट करतात. या सदाशिवाच्या अंगोपांगावर मोजकेच परंतु कलाकुसरीची अलंकार सोनाराने सोन्यात घडवावे. असे दागिने कलाकाराने दगडातील मूर्तीवर कोरले आहेत.

त्रिवलयांकीत गळ्यामध्ये मोत्याची माळ व हार असून हाराला खाली साखळ्या असून कलाकाराने हे सर्व
दगडात उतरवून या मूर्तीच्या सौंदर्यात भर घातलेली दिसते. अशी ही देखणी प्रमाणबद्ध सदाशिव मूर्ती पाहताना
समस्त रसिक जणांची नजर खेळवून ठेवते.

शैव आगमनानुसार ही शिवाची सर्वात वरच्या श्रेणीची मूर्ती असून सदाशिव म्हणजे परमोच्च. जो निराकार असून सर्वव्यापी आहे. अघोर, तत्पुरुष, वामदेव, सद्योजात, ईशान म्हणजे पंचब्रह्म. शिवाच्या पाच अवस्थिती; आत्मा, भौतिक जग, बुध्दी, अहंकार, मन याची प्रतिके मानली जातात. तसेच ही पाच मुखे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात त्यात पूर्वेकडील तत्पुरुष वायुतत्व दक्षिणेकडील अघोर अग्नीतत्व, उत्तरेकडील वामदेव जलतत्त्व, पश्चिमेकडील सद्योजात पृथ्वीतत्व, ईशान आकाश तत्व. (विष्णू धर्मोत्तर पुराण संदर्भ) अशा या सदाशिवाच्या मूर्तीतून शिव देवतेचे सर्वसाक्षीतत्व , सर्वव्यापकत्व असे सर्वेश्वराचे रूप जे की अनंत आहे. असा गहनअर्थ या सदाशिवमूर्ती मागेआहे.

 

लेण्याच्या पश्चिम बाजूस पूर्वाभिमुख सर्वोतभद्र प्रकारातील शिव मंदिर असून त्यात उंच चौरस शाळूंका असून तिचे मधोमध शिवलिंग आहे.
हे शिवाचे निष्कल रूप होय. एरवी शिव मंदिरातील गाभाऱ्यात शिवाचे निष्कलं अमूर्त रूप हे शिवलिंगाच्या रूपात आपण पुजतो व पाहतो.
परंतु या घारापुरीच्या लेण्यात शिव या देवतेचे मूर्त_ अमूर्त, सकल_ निष्कलं असे दोन्ही रूप सदाशिव आणि शिवलिंग स्वरूपात आहे.
जे इतरस्त कोठेही पहावयास मिळत नाही. हे या लेणीचे वैशिष्ट्य आहे.

 

शिवलीलांच्या मूर्तीतून शिवप्राप्ती हे भक्ताचे अंतिम ध्येय व शिवतत्वाशी एकरूप होण्याचा साधकाचा प्रवास या घारापुरी लेणी निर्मिती मागची संकल्पना आहे.
आणि ती प्रत्यक्षात उतरण्याचे शिवधनुष्य कलाकारने यशस्वीरित्या पेलले होते याचा प्रत्यय लेणी पाहताना येतो.
‘एलिफंटा केव्हज् ‘ या नावाने ही लेणी ओळखली जातात.
या घारापुरी लेणीस 1987 साली युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा मिळाला असून
भारत सरकारच्या पुरातत्व सर्वेक्षण विभाग व पर्यटन विभागाच्या आखत्यारित ही लेणी येतात.

प्राचीन काळातील समृद्ध कलेचा उत्कृष्ट अविष्कार पाहण्याचा व समजून घेण्याचा माझा प्रवास सफल संपूर्ण झाला.
‘शिव’ या देवतेचे स्मरण करून आपण आपली संस्कृती, वारसा याचे संरक्षण व संवर्धन करून ही महाशिवरात्र साजरी करू.

 

सौ. वैशाली शिंदे (पुणे)
प्राचीन कला स्थापत्य, संस्कृती इतिहास अभ्यासक.

 

Web Title :- Policenama News | Policenama News Gharapuri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय