पूजा चव्हाणच्या मृत्यूचा अहवाल पोलिसांच्या ‘हाती’; अखेर मृत्यू प्रकरणाचे गुढ उकलले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – परळीच्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा अहवाल पुणे पोलिसांच्या हाती आला असून, सुरुवातीला प्राथमिक अहवालात जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता सविस्तर आलेल्या अहवालात देखील पुजाचा मृत्यू जबर दुखापतीमुळेच झाला असल्याचे म्हटले आहे. मणक्याला व डोक्याला जबर दुखापत झाल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे या सविस्तर अहवालात म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

गेल्या महिन्यात 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने वानवडी येथील एका इमारतीवरून (दि. 7 फेब्रुवारी) पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मात्र आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी पूजासोबत असलेले अरुण राठोड व विलास चव्हाण यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आणि यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले. नुकतीच या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता याचा तपास सुरू आहे. भाजपने गुन्हा दाखल करावा, यासाठी रान उठवले आहे.

दरम्यान पूजा हिच्या आत्महत्येचा अहवाल बाकी होता. त्याचा सविस्तर अहवाल पुणे पोलिसांना मिळाला आहे. त्यात देखील आता पूजाच्या मणक्याला व डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला असल्याचे म्हंटले आहे.