Pooja Chavan Suicide Case : वनमंत्री राठोडांचा राजीनामा घेतला तर मुख्यमंत्र्यांना आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल

पोलीसनामा ऑनलाईनः राज्याच्या राजकारणात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत असताना वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. भाजपाच्या नेत्यांकडून वनमंत्री राठोड यांच्यावर कारवाई आणि राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे देखील पूजा चव्हाण प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या सुशांत सिंग प्रकरणात आणखी एका मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागेल, अशी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता राणे यांनी खरमरीत टीका केली आहे.

केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी नारायण राणे मंगळवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. राणे म्हणाले की, महाविकासआघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून एकही आश्वासन ठाकरे सरकारने पूर्ण केले नाही. त्याचबरोबर या सरकार मधील अनेक नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप झाले आहेत. आत्महत्या नसून ही हत्या असल्याची शक्यता राणे यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असून एकप्रकारे पाठबळ देत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून दिलेल्या ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे.