संजय राठोड यांनी हात जोडून केली विनंती, म्हणाले – ‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्यावर झालेले आरोप हे तथ्यहीन आहेत. माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करू नका. मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका अशी विनंती शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजा चव्हाण हिनं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अशात आता संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर आज पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संजय राठोड म्हणाले, 15 दिवस मी कुठेही गेलो नव्हतो माझ्या पत्नीला ब्ल्ड प्रेशरचा त्रास आहे. आई वडिल वृद्ध आहेत. त्यांच्या सोबत 10 दिवस होतो. या काळात मी त्यांच्या सोबत होतो. या काळात कोणतंही काम थांबलं नाही. 10 दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिलं. अरुण राठोड कोण आहे हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वजण फोटो काढत असतात. परंतु एका घटनेमुळं मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

पुढं बोलताना राठोड म्हणाले, पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळं संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. या प्रकरणी महाराष्ट्रात खूप घाणेरडं राजकारण करण्यात आलं आहे.

मंत्री राठोड असंही म्हणाले, मी गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे. परंतु या प्रकरणामुळं वाटेल ते आरोप करून माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडियातून जे काही दाखवण्यात आलं होत, त्यात काहीही तथ्य नाही असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. पोलीस चौकशीतून सत्य समोर येईल असंही राठोड म्हणाले.