Pooja Chavan Suicide Case : गॅलरीच्या कठड्यावर बसलेल्या पूजाला कोणी ढकलले की पडली ?

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचा संबंध जोडल्या गेल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईला तातडीने बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली आहे. दरम्यान, पूजाने मद्य प्राशन केले होते. ती गॅलरीच्या कठड्यावर बसलेली होती, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले. त्यामुळे आता तिला कोणी ढकलले की ती पडली असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपस सुरु केला आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाचा सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाने पत्र पाठवले असून तपास झाल्यानंतरच अहवाल पाठविणार असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात १२ ऑडीओ क्लिप व्हयरल झाल्या आहेत त्यामधील सभाषणावरून सोशल मीडियावर कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. भाजपने संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्यची मागणी करत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही भाजपने व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाचे पत्र मिळाले असल्याचे सांगत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या की, सर्व अंगाने तपास सुरु आहे. पूजाचे कुटुंबीय गावी असून आमच्याकडे त्यांच्यापैकी कोणाचीही तक्रार आलेली नाही. घटनेवेळी उपस्थित असणारा तिचा चुलतभाऊ, मित्र व संबधितांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

पूजा चव्हाण भाड्याच्या घरात राहत होती. पूजा तेथे गेल्या ८ दिवसांपूर्वीच राहण्यासाठी आली होती. या घराची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा घरात मद्याच्या ४ बाटल्या सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरुन घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पूजाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तिच्या सोबत असलेल्या तिच्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यात गुन्हा नोंद करता येत नाही. मात्र या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत आम्ही तपास करणार असल्याचे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड म्हणाले.