Pooja Chavan Suicide Case : ‘पूजा अरूण राठोड’च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळं चर्चेला उधाण ! परंतु…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आता आणखी मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का यबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही. पूजा अरूण राठोड नावाची महिला 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. अहवालात याबाबत नोंद आहे. तिचा वॉर्ड नंबर 3 होता. डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसत आहे. परंतु याबाबतची वस्तुस्थिती वेगळी आहे असा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी केला आहे.

वराडे म्हणाले, त्या महिलेवर डॉ. रोहिदास चव्हाण यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले आणि दुपारी तिला घरी सोडण्यात आलं होतं. पूजा अरूण राठोड (22) या महिलेला मी पाहिलं देखील नाही. परंतु मी 5 फेब्रुवारी रोजी युनिट 2 साठी म्हणजेच सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी (6फेब्रुवारी) सकाळी 9 वाजेपर्यंत कार्यरत होतो. दरम्यान माझं युनिट सुरू असताना युनिट 1 चे डॉ. रोहिदास चव्हाण यांनी पहाटे 4.34 वाजता संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं. आणि तिला सखी या कक्षात डॉ. चव्हाण यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. डॉ. चव्हाण यांचं युनिट 1 हे 6 फेब्रुवारीच्या सकाळी 9 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशीच्या (7 फेब्रुवारी) सकाळी 9 पर्यंत सुरू होतं. या महिलेच्या उपचाराशी माझा तसूभरही संबंध नाही. पूजा अरूण राठोड या महिलेबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डॉ. रोहिदास चव्हाण यांच्याशी संपर्क साधू शकता.

डॉ. रोहिदास चव्हाण 6 दिवसांच्या रजेवर होते
डॉ. रोहिदास चव्हाण हे गेले 6 दिवस आई आजारी असल्याचं कारण सांगून रजेवर गेले होते. काल म्हणजेच (मंगळवार दि 16 फेब्रुवारी) ते हजर राहणार होते. परंतु ते हजर झाले की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना संपर्क साधला गेला होता. परंतु त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता.

व्हायरल झालेल्या शॉर्ट केस रिपोर्टामध्ये नेमकं काय ?
शॉर्ट केस रिपोर्टमध्ये रुग्णाचं नाव पूजा अरूण राठोड (22) असून तिच्यावर जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत उपचार करण्यात आले. पहाटे 4.34 मिनिटांनी तिला युनिट 2 मध्ये वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दाखल करण्यात आलं. या रिपोर्टवर युनिट 2 चे प्रमुख डॉ. श्रीकांत वराडे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे.

मध्यरात्री HMIS कक्ष उघडण्यामागील कारण काय ?
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी जे रुग्ण दाखल होतात त्यांची नोंद Hospital Management Integrated System प्रणालीत घेतली जाते. पूजा चव्हाण प्रकरणी या रुग्णालयाचा संदर्भ येताच इथंही हालचाली सुरू झाल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री HMIS कक्ष उघडण्यात आला होता. एवढ्या रात्री हा कक्ष उघडण्यामागील कारण मात्र गुलदस्त्यात आहे. तिथल्या यंत्रणेत याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. कक्ष उघडण्याच्या घटनेकडे साशंकतेनं पाहिलं जात आहे. कक्ष उघडण्याचा हा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांसाठी तपासाचा धागा ठरू शकतो.