कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी; 50 वर्षांच्या नागरिकांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार, येत्या मार्च महिन्यापासून देशातील 50 वर्षांवरील नागरिकांना कोरोना व्हायरसवरील लस दिली जाणार असल्याची माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.

सध्या देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे. पण आता मार्च, 2021 पासून 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, या लसीकरणामध्ये अशा लोकांचा समावेशही केला जाणार आहे, ते इतर काही गंभीर आजाराने त्रस्त असतील आणि त्यांचे वय 20 ते 50 वर्ष असेल, अशा लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे.

दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की हाय रिस्क वर्कर्स किंवा प्राणी-पक्ष्यांवर उपचार करणाऱ्या लोकांचा या लसीकरणात समावेश केला नाही. कारण ते कोविड-19 रुग्णांवर उपचार करत नव्हते.

वय आणि आजारावरून प्राथमिकता
कोरोनावरील लस देण्यापूर्वी त्याच्या प्राथमिकतेवर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये रुग्णाचे वय आणि त्याला कोणता गंभीर आजाराने ग्रासले आहे, यावरच लसीकरणाची प्राथमिकता अवलंबून असेल.

देशात कमी होतीये कोरोनाबाधितांची संख्या
देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होत आहे. या महिन्यात तिसऱ्यावेळेस 10,000 पेक्षाही कमी रुग्णसंख्या पाहिला मिळत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.