बाप रे ! पीएफची २० हजार कोटींची रक्कम बुडण्याची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था – पगारदार मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लीजिंग फायनान्शियल सर्विसेस (IL&FS) या ग्रुपमध्ये जवळपास १५ ते २० हजार कोटीच्या भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतनाच्या निधीची गुंतवणूक करण्यात आलेली असून आता ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे अशी माहिती समोर आली आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता लाखो पगारदार मध्यमवर्गीयांचा आधार असलेली भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतनाची हजारो करोडाची रक्कम बुडण्याची शक्यता निर्माण झाल्याचं दिसत आहे. गुंतवणूक तज्ञांच्या मते, IL&FS वर ९१ हजार कोटीचे कर्ज आहे. यामुळे त्यांना कर्ज स्वरुपात निधी देणाऱ्यांना याचा फटका बसू शकतो.

रेग्युलेटरी फाइलिंगच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, IL&FS कडे ९१ हजार कोटीचे कर्ज आहे. भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्समधील एकूण रक्कम ही IL&FS ला बँक, म्यूचुअल फंड आदी योजनांकडून प्राप्त निधीपेक्षा भिन्न आहे. यामुळे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक झालेल्या २० हजार कोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. IL&FS कडे असणाऱ्या ९१ हजार कोटींच्या कर्जापैकी, ६१ टक्के रक्कम बँकेची आहे तर उर्वरित रक्कम कर्जरोखे आणि कमर्शिअल दस्तावेजावरील कर्जातून मिळालेली आहे.

AAA मुळे झाली गुंतवणूक
IL&FS सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो शिवाय IL&FS या कंपनीला AAA अर्थात गुंतवणुकीस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त आहे. याच गोष्टींचा विचार करून भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या काही फंड्सने IL&FS चे काही बॉंडस खरेदी केले. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे असे समजत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने  या बॉड्सच्या माध्यमातून गुंतवलेली २० हजार कोटीची रक्कम बुडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बँकासुद्धा बुडण्याची शक्यता
या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या काही बँकाही बुडण्याची शक्यता आहे. IL&FS मध्ये सर्वात जास्त रक्कम येस बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा यांची अडकली आहे. मात्र यात बँकांमध्ये कोणत्या भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सची रक्कम अडकलेली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु या ग्रुपचे ४० टक्के बॉंड्स हे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्स कडे असण्याची शक्यता एका बँकर तज्ञाने वर्तवली आहे. दरम्यान, याबाबत IL&FS कडून कुठलीही माहिती मिळू शकली नाही.