शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 31 जुलैपूर्वी ‘नोंदणी’ करणाऱ्यांनाच मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोदी सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने (PMFBY) चा लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकांच्या विम्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा सुविधा नको असेल त्यांनी शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधी त्यांच्या बँक शाखेत लेखी कळवावे. कर्ज न घेतलेले शेतकरी सीएससी, बँक, एजंट किंवा विमा पोर्टलवर पीक विमा स्वत: करू शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळते. हवामानातील अचानक बदल किंवा पावसाळ्याच्या वेळी बर्‍याच शेतकर्‍यांची मेहनतीची कमाई ही काही क्षणातच वाया जाते. शेतकर्‍यांच्या याच समस्येच्या विचारात भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी याची सुरुवात केली.

पीक विमा योजनेत कोणत्या कारणांमुळे मिळते नुकसान भरपाई?

कृषिमंत्री म्हणाले की या योजनेंतर्गत गारपीट, जमीन धसने, पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिली जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास केंद्र सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये अत्यंत महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू केली.

PMFBY मध्ये कसा मिळतो लाभ –

पेरणीच्या 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तरच विमा रकमेचा लाभ देण्यात येतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले असेल तर या विम्याचा फायदा होतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती, गारपीट, दरड कोसळणे, ढगफुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो तसेच पीक काढणीनंतर पुढील 14 दिवसांपर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकाची पेरणी झाली नसेल तरी देखील या विम्यापासून लाभ होतो.

किती प्रीमियम भरावा लागतो –

खरीप पिकासाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकासाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो. पीएमएफबीवाय योजना व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतक्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.

लाभ मिळवण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता –

शेतकर्‍याचा एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून एक पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पिकाचा पुरावा द्यावा लागतो.

दाव्यासाठी शेतकरी विमा कंपनीच्या टोल-फ्री नंबर 18002005142 किंवा 1800120909090 वर संपर्क साधू शकतात किंवा विमा कंपनी व कृषी विभाग तज्ञाशी संपर्क साधू शकतात. यासाठी 72 तासांचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास, शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.