पाकिस्तानमध्ये गर्भवती गायिकेची गोळी झाडून हत्या

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये क्रूरतेची परिसीमा गाठल्याचे आता आणखी एका घटनेवरून दिसत आहे. पाकिस्तानमधील सिंध तालुक्यात असलेल्या कांगा गावात सहा महिन्यांची गर्भवती गायिकेने उभे राहून गाण्यास नकार दिल्याने तिची एका प्रेक्षकाने निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या केली. समिना सिंधू उर्फ समिना समून (वय 24) असे या गायिकेचे नाव आहे.

एका कार्यक्रमाचे समिना गाणे सुरू असताना तारीक अहमद जातोई नावाच्या क्रूर व्यक्तीने समिनाला उभे राहून गाणे सादर करण्यास सांगितलं. मात्र, गर्भवती असल्याने समिनाने ते शक्य नसल्याचे सांगितले. अशा संगीताच्या कार्यक्रमात काहींनी तिच्यावर पैसे उधळले. यानंतर ती उभी राहून गाणे सादर करु लागली. आपली मागणी धुडकावल्याच्या रागातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तारीकने समिनावर गोळी झाडली. समिनाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हा सर्व प्रकार एका प्रेक्षकाने कॅमेरात कैद केला असून, हत्येनंतर दोन दिवसांनी पाकिस्तानातील खासगी वृत्तवाहिनीने ही व्हिडिओ क्लीप जगासमोर आणली. पत्नी गर्भवती असल्याने समिनाच्या पतीने या प्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपी तारीकला अटक केली आहे.